टायगर मेमन हा मुंबई बॉम्बस्फोट कटाचा एक मुख्य सूत्रधार. याकूब हा त्याचा भाऊ. पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट. बॉम्बस्फोटाच्या दोन दिवस आधीच मेमन बंधू त्यांच्या कुटुंबीयांसह दुबईला पळाले होते. तेथे काही दिवस ते राहिले. त्यानंतर त्यांना कराचीला हलविण्यात आले. याकूबची पत्नी राहिन हिच्या म्हणण्यानुसार ते कराचीत नदरकैदेतच होते. ही नजरकैद अर्थातच आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची होती. त्या जाचाला कंटाळून ते भारतात आले. तिच्या मते याकूब १९ जुलै १९९४ मध्ये स्वत:हून भारतात आला. पण त्याला अटक करण्यात आल्याचे दाखविण्यात आले.
भारतीय गुप्तचर संस्था रॉचे तत्कालीन अधिकारी (अतिरिक्त सचिव, कॅबिनेट सचिवालय) बी. रमण यांच्या मते याकूब मेमनला रॉ, सीबीआय आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक भारतात आणले. खुद्द तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे या गुप्तचर मोहिमेवर लक्ष ठेवून होते. रमण यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका लेखामध्ये या मोहिमेबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार, त्याची आणि मेमन कुटुंबीयांतील काही जणांची शरण येण्याची इच्छा होती. त्यासंदर्भात सल्ला घेण्यासाठी तो कराचीहून गुपचूप काठमांडूला गेला होता. तेथे त्याला त्या वकिलाने आणि त्याच्या कुटुंबातील काही जणांनी शरण जाऊ नका, असे सांगितले. त्यांनी त्याला कराचीला परतण्याचा सल्ला दिला. मात्र तो कराचीच्या विमानात बसण्यापूर्वीच रॉच्या गुप्तचरांनी नेपाळ पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. तेथून त्याला एव्हिएशन रिसर्च सेंटरच्या विमानाने दिल्लीत आणण्यात आले आणि मग तेथे औपचारिकरीत्या त्याला अटक करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेचे समन्वयन रमण यांनीच केले होते. येथे आल्यानंतर याकूबने सुरक्षा यंत्रणांशी सहकार्य केले. मेमन कुटुंबीयांतील काही व्यक्तींना आयएसआयच्या तावडीतून सुटून भारतात येण्यासाठी त्यानेच तयार केले. त्या व्यक्ती तेथून दुबईला गेल्या आणि त्यांना तेथून इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेत सामील असलेल्यांना आरडीएक्स उपलब्ध करून देणे, बॉम्ब ठेवण्यासाठी वाहने पुरविणे, कटात सहभागी असलेल्यांना विमानाची तिकिटे काढून देणे अशा विविध गुन्हय़ांखाली २००७ मध्ये याकूबला सक्तमजुरी, जन्मठेप आणि फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याच्या एसा, युसुफ या भावांसह वहिनी रुबीना हिला जन्मठेपेची शिक्षा झाली असून, त्याचे वडील अब्दुल रझाक यांचे खटल्याचा निकाल येण्यापूर्वीच निधन झाले. आई हनिफा, याकूबची पत्नी राहिन, भाऊ सुलेमान यांची मात्र निर्दोष मुक्तता झाली असून, त्याचा भाऊ टायगर व अयुब तसेच त्यांचे कुटुंबीय फरार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा