डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन जवळ येत असतानाच इंदू मिल जमिनीच्या प्रश्नावर रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली उद्या, गुरुवारी दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहे, तर आनंदराज आंबेडकर यांनी याच प्रश्नावर आपली भूिंमका ठरविण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनीही राज्य सरकारने जमिनीचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच स्मारक उभारले जाणार आहे, असे स्पष्ट केले आहे. मात्र जमीन हस्तांतरणाचा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी आंदोलनाची तयारी केली आहे. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली उद्या दिल्लीत संसद भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ५ डिसेंबपर्यंत जमीन ताब्यात घेण्याचा निर्णय झाला नाही तर ६ डिसेंबरला आरपीआयचे कार्यकर्ते इंदू मिलचा ताबा घेतील, असा इशारा देण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात २३ राज्यांतील ५० हजार कार्यकर्ते सहभागी होतील, असा दावा आठवले यांनी केला आहे. इंदू मिलचा प्रश्नावर उग्र आंदोलन करुन केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधून घेणारे आनंदराज आंबेडकर यांनीही जमीन हस्तांतरणास विलंब केला जात असल्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे. ६ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर नेमकी काय भूमिका घ्यायची हे ठरविण्यासाठी उद्या त्यांनीही रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली आहे, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ निकाळजे यांनी दिली.
रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी मात्र ६ डिसेंबरला आंदोलन करु नये, अशी सबुरीची भूमिका घेतली आहे. इंदू मिलची जमीन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या प्रश्नावर सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी इंदू मिल जमिनीचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा अशी मागणी केली आहे. एकूण ६ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर इंदू मिलच्या प्रश्नावर वातावरण तापविण्याचा रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसते.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा