विविध भाषा, संस्कृतीने नटलेल्या मुंबईला भविष्यात जागतिक पातळीवरील ‘आर्थिक केंद्र’ बनविण्याचा मानस असून ‘मेक इन इंडिया’च्या निमित्ताने त्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार आहे. परिणामी, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या मुंबईची दक्षिण-पूर्व आशियातील आर्थिक केंद्र म्हणून नवी ओळख जगाला करून देण्याचा प्रयत्न आहे.
मुंबईमध्ये १३ ते १८ फेब्रुवारी या काळात होऊ घातलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारतातील इतर राज्ये आणि विदेशातील नागरिकांचेही लक्ष लागले आहे. ‘मेक इन इंडिया’मध्ये मुंबईचे सादरीकरण कशा पद्धतीने करण्यात येणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या सप्ताहानंतर अल्पावधीतच मुंबई नवे रूप घेऊन सर्वासमोर येणार आहे.
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. विविध धर्माचे, पंथांचे लोक मुंबईच्या आश्रयाला आहेत. त्यामुळे मुंबईत विविध संस्कृतींचे दर्शनही घडते. पायाभूत सुविधांचे जाळे, दळणवळणासाठी उत्तम पर्याय, सार्वजनिक वाहतूक, वीज आणि पाणीपुरवठा, विमानतळ, छोटे-मोठे उद्योग, रोजगाराची मोठी संधी, उत्तम शाळा, हॉटेल, चित्रपटगृहे आदी सुविधा मुंबईत उपलब्ध आहेत. आर्थिक विश्वामध्ये मुंबईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाते. या सर्व सुविधा असल्यामुळे आता मुंबईला जागतिक पातळीवर आर्थिक केंद्र म्हणून नवी ओळख मिळावी यासाठी ‘मेक इन इंडिया’मध्ये प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मुंबईमध्ये वित्तीय सेवा, माहिती-तंत्रज्ञान, बॉलीवूड, प्रसारमाध्यम आदी सेवा उत्तम आहेत. मुंबईला औद्योगिकीकरणाचा इतिहास आहे. अनेक उद्योगांची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली आहे. मुंबईतील तरुण पिढी उच्चशिक्षित असून तरुणाई उत्तम विचारसरणीची आहे. उद्योगासाठी इथे पोषक वातावरण आहे. त्यामुळे मुंबई आता केवळ देशाची आर्थिक राजधानी राहिलेली नाही, तर दक्षिण-पूर्व आशियामधील ती एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र बनू शकते. त्यासाठी ‘मेक इन इंडिया’च्या निमित्ताने जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्याअंतर्गत ‘मेक इन मुंबई’ संकल्पना मांडण्यात येणार आहे. त्याला नक्कीच यश येईल, असा आशावाद अजय मेहता यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा