उत्तर प्रदेशातील तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला विक्रीसाठी मुंबईत घेऊन आलेल्या दाम्पत्याचा डाव टिळक नगर पोलिसांना उधळून लावत मुलीची सुटका केली आहे. रेल्वे स्थानकावरील रिक्षा चालकाने सतर्कता दाखवून पोलिसांना वेळीच याबाबतची माहिती दिली. त्यामुळे हा प्रकार रोखण्यात पोलिसांना यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक दाम्पत्य, त्यांचा लहान मुलगा व एक तरूणी २० मे रोजी पवन एक्स्प्रेसमधून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर आले होते. त्यावेळी हे दाम्पत्य रेड लाईट एरियाबद्दल विचारपूस करत होते. त्यावरून रिक्षाचालक विनोद शर्मा याला संशय आला. त्याने अधिक खोलात विचारले असता संबंधीत तरूणीची ४० हजार रुपयांत विक्री करण्यासाठी तिला आणल्याचे रिक्षा चालकाला समजले. त्याने तातडीने टिळक नगर पोलिसांना दूरध्वनी करून याबाबतची माहित दिली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा संपूर्ण कट उधळवून लावत तरूणीची सुटका केली.

हेही वाचा >>>मुंबई: पालिका मुख्यालयात उद्या प्रवेश बंद

तक्रारदार तरूणी उत्तर प्रदेशातील आझमगड येथील रहिवासी आहे. पीडित मुलीचे घरातल्यांशी पटत नव्हते. आरोपी अमनने हेच हेरून तरूणीशी ओळख वाढवली. त्यानंतर तिला पळून जाऊन लग्न करूया असे सांगितले. पीडित तरूणीही त्यासाठी तयार झाली. अखेर १८ मे रोजी पीडित मुलगी तरूणासह घरातून पळाली. त्यांनी बनारस येथून रेल्वे पकडली. त्यावेळी अमनसह एक महिला व तिचे बाळ होते. अमनने ती त्याची वहिनी असल्याचे पीडित तरूणीला सांगितले. त्यानंतर तो तिला टिळक नगर येथे घेऊन आला. रिक्षा चालक विनोद शर्माच्या सतर्कतेमुळे आरोपींना पकडल्यानंतर अमनसोबत असलेली महिला त्याची पत्नी व ते बाळ त्याचा मुलगा असल्याचे समजले. त्यावेळी तिच्या पायाखालची वाळू सरकली. अखेर या तरूणीच्या तक्रारीवरून लग्नासाठी फसवून अपहरण केल्याप्रकरणी आरोपी अमन व त्याच्या पत्नीविरोधात टिळक नगर पोलिसांनी भादंवि कलम ३६६ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trying to trick a girl from uttar pradesh and sell her in mumbai print news amy
Show comments