मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार महाराष्ट्राला क्षयरोग मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात आरोग्य विभागाकडून क्षयरोग मुक्त पंचायत अभियान हाती घेतले आहे.

या अभियानाला शनिवारी रायगडमधून सुरुवात झाली. आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त धीरज कुमार यांच्या उपस्थितीमध्ये या अभियानाची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार देशातील एक हजार पंचायतमध्ये क्षयरोग मुक्त अभियान राबविण्यात येत आहे.

हेही वाचा – मुंबई : घरांचा साठा रोखणारे ‘म्हाडा’चे दोन निर्णय अद्यापही अस्तित्वात!

हेही वाचा – कोकण रेल्वेच्या दोन गाड्यांना आता एलएचबी डबे

‘क्षयरोग मुक्त पंचायत’ या अभियानाला महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातून सुरुवात होत असून, सुरुवातीला १० गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास १० हजार नागरिकांची या अभियानातून तपासणी करण्यात येणार आहे. त्यातून आढळणाऱ्या क्षयरोग रुग्णांचे निदान, उपचार आणि निर्मुलन करण्यावर भर देण्यात येणार आहे. ‘क्षयरोग मुक्त पंचायत’ हे अभियान रायगडमध्ये यशस्वी झाल्यानंतर ते संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त धीरज कुमार यांनी दिली.