लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. मात्र मागील अनेक महिन्यांपासून क्षयरुग्णांना औषधेच मिळालेली नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांच्या घोषणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईसह राज्यामध्ये एमडीआर क्षयरोग रुग्णांना जूनपासून औषधेच मिळालेली नाहीत. सरकारी रुग्णालयांमध्ये औषधेचे उपलब्ध नसतील, तर देश क्षयरोगमुक्त कसा होईल, असा प्रश्न उपस्थित करणारी पत्रे रुग्णांनी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांना पाठविली आहेत.

आणखी वाचा-उंचीवर मर्यादा घालण्यास सरकार अनुत्सुक; दहिहंडीच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत न्यायालयाने निर्णय देऊनही चालढकल

राज्यातील सरकारी रुग्णालयांसह विविध आरोग्य केंद्रांवर मागील तीन महिन्यांपासून क्षयरोगावरील औषधेच उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे मुंबई विभागातील जवळपास ११ हजार एमडीआर क्षयरोग रुग्णांना याचा फटका बसत आहे. आरोग्य केंद्रांवर औषधे मिळत नसल्याने रुग्णांना खासगी औषधांच्या दुकानातून औषधे खरेदी करावी लागत आहेत. एमडीआर क्षयरोग असलेल्या रुग्णांना पाच औषधे दिली जातात. त्यापैकी सायक्लोसिरिन लाईनजोलिड, क्लोफाजिमाईन या औषधांचा साठाच उपलब्ध नाही. त्यामुळे ही औषधे रुग्णांना बाहेरून विकत घ्यावी लागत असल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ही औषधे कधी मिळतील याबाबत मुंबई क्षयरोग नियंत्रण विभागाकडे विचारणा करण्यात आल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. औषधांअभावी क्षयरोग रुग्णांना होणाऱ्या या त्रासाची माहिती देण्यासाठी क्षयरुग्णांसाठी काम करणाऱ्या समाजसेवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र पाठविली आहेत. औषधे का उपलब्ध होत नाहीत, असी विचारणाही या पत्रात करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tuberculosis patients appeal to pm for medicines mumbai print news mrj
Show comments