मुंबई : Tunisha Sharma suicide case छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेला अभिनेका शिझान खान याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नातेसंबंध जोडणे आणि नंतर काही कारणास्तव हे नाते तुटणे हे जीवनाचे सर्वसाधारण पैलू आहेत. त्यामुळेच तुनिषाच्या आत्महत्येसाठी त्याला जबाबदार धरता येणार नाही, असा दावा खान याने जामिनाची मागणी करताना केला आहे.
खान याने जामिनासाठी आणि त्याच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेऊन दोन स्वतंत्र याचिका केल्या आहेत. त्याच्या जामिनाच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. तपासाला स्थगिती देण्याची व त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यापासून पोलिसांना मज्जाव करण्याची मागणीही खान याने केली आहे. गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेतही खान याने जामिनावर सुटका करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी आणि तुनिषाच्या आईने केलेले आरोप हे आपल्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे कलम लावण्यासाठी पुरेसे नसल्याचा दावा खान याने केला आहे. दोन व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या नातेसंबंधात असतील आणि काही कारणास्तव पुढे जाऊन हे नातेसंबंध संपुष्टात आले. तसेच त्यातील एकाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, तर दुसऱयाला त्यासाठी जबाबदार धरले जाऊ शकत नाही. आपल्याबाबतही हीच स्थिती आहे. शिवाय आपण तुनिषा हिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा नाही, असा दावाही खान याने दिलासा मागताना केला आहे.