मंगल हनवते
मुंबई : पायाभूत सुविधा प्रकल्पातील भुयारी कामासाठी टनेल बोरिंग (टीबीएम) यंत्राचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यासाठी ही यंत्रे परदेशातून आणण्यात येतात. मात्र. जर्मनील एक कंपनी चेन्नईत अशा चार यंत्रांची लवकरच बांधणी करणार आहे. त्यांचा वापर प्रस्तावित ठाणे – बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामासाठी होणार आहे. यामुळे ही यंत्रे परदेशातून आणण्याचा खर्च आणि वेळ वाचणार आहे.
ठाणे-बोरिवली अंतर केवळ २० मिनिटात पार करता यावे यासाठी ११.८ किमी लांबीचा भुयारी मार्ग अर्थात दुहेरी बोगदा प्रकल्प ‘एमएमआरडीए’कडून प्रस्तावित आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हैदराबाद येथील मेघा इंजिनीयरिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. तर, या प्रकल्पासाठी १६,६००.४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे बोगदे चार ‘टीबीएम’च्या सहाय्याने करण्यात येणार आहेत. जर्मनीतील एक नामांकित कंपनी चेन्नईतील कारखान्यात या यंत्रांची बांधणी करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पहिल्यांदाच भारतात टीबीएमची बांधणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील ३०० चौरस मीटरच्या बांधकामांना सीआरझेड सवलत!
‘टीबीएम’ची परदेशात बांधणी करून ती भारतात आणण्यासाठी खूप वेळ आणि निधी खर्च होते. महत्त्वाचे म्हणजे ही यंत्रे नादुरुस्त झाल्यास परदेशातून तज्ज्ञांना बोलवावे लागते. पण, दुहेरी बोगद्यासाठीची टीबीएम चेन्नईतच तयार होणार असल्याने त्याचा फायदा होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
प्रकल्पाला राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी
ठाणे – बोरिवली या प्रस्तावित मार्गातील दुहेरी बोगदा प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पार केला आहे. या प्रकल्पास आवश्यक असणारी राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंडळाच्या २२ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ठाणे – बोरीवली दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी एमएमआरडीएने ठाणे- बोरीवली दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली अंतर केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे. शक्य तितक्या लवकर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष आहे. मात्र, हा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जात असल्याने यासाठी राज्य वन्यजीव मंडळ आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. या दोन्ही परवानग्यांनंतर दुहेरी बोगद्याच्या कामास सुरुवात करता येणार आहे.