विमानात संशयास्पद मोबाईल सापडल्यामुळे सोमवारी मुंबई विमानतळावर एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तुर्की एअरलाईन्सचे हे विमान मुंबईहून इस्तंबुलला जात होते. विमानाने धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हा मोबाईल कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडला. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी या मोबाईलबद्दल प्रवाशांना विचारणा करण्यात आली. मात्र, कोणीही हा मोबाईल घेण्यासाठी पुढे आले नाही. पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने हे विमान पुन्हा मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर उतरविण्यात आले. दरम्यान, विमान धावपट्टीवर उतरविण्यात आल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांकडून मोबाईल ताब्यात घेण्यात आला व विमानाचीही कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत विमानामध्ये अन्य कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. त्यामुळे या विमानाचे थोड्याच वेळात पुन्हा उड्डाण होणार आहे.

Story img Loader