मुंबई : हवामान प्रकोपाचा फटका शेतीला बसत आहे. अति उष्णता, सततच्या पावसामुळे देशभरात हळद लागवड घटली आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगाणातील शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवल्यामुळे हळद लागवड क्षेत्राच ३५ हजार हेक्टरने घट झाली आहे.
कसबे डिग्रज येथील हळद संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात २०२३ – २०२४ मध्ये ३ लाख ५ हजार १८२ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड झाली होती. यंदाच्या हंगामात सुमारे ३५ हजार हेक्टरने घट होऊन हळदीचे क्षेत्र २ लाख ७० हजार हेक्टरवर स्थिरावले आहे. गत तीन – चार वर्षे हळदीला चांगला दर मिळल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वेगाने वाढ झाली होती. राज्यात पश्चिम महाराष्ट्रातील क्षेत्रात वेगाने घट होत असतानाच मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये हळदीच्या क्षेत्रात वेगाने वाढ झाली होती. पण, गत दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत आहे. वर्षभर कमी – जास्त प्रमाणात पाऊस पडू लागल्यामुळे हळदीच्या वाढीवर परिणाम झाला. हळदीचे कंद कुजू (सडले) लागले. त्यामुळे हळद उत्पादनात मोठी घट झाली, दर्जाही घसरला. अनेक ठिकाणी हळदीचे बियाणेही सडले होते.
हळदीची लागवड ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल – मे – जून, या काळात होते. यंदा नेमक्या याच काळात राज्यातील तापमान सरासरी ३५ अंश सेल्सिअसच्या वर होते. त्यामुळे हळद लागवडीच्या काळात पाण्याची टंचाई जाणवली. अति उष्णतेमुळे हळदीचे बियाणे सडले. त्यामुळे हळद लागवडीवर परिणाम झाला होता. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी लागवड पुढे ढकलली होती. जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सतत पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांना हळद लागवड करता आली नाही. उलट लहान रोपे असताना शेतात सतत पाणी साचून राहिल्यामुळे पीक पिवळे पडले होते. दुसरीकडे हळदीच्या उत्पादन खर्चात सतत वाढ होत राहिली. वाढत्या खर्चाच्या तुलनेत हळदीला दर न मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंदा देशभरात हळदीचे क्षेत्र २ लाख ७० हजार हेक्टरवर स्थिरावले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ३५ हजार १८२ हेक्टरने क्षेत्रात घट झाली आहे.
उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत घट शक्य
गतवर्षी सतत पाऊस पडत राहिला. जून महिन्यापासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरअखेर सुरू होता. शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे हळद पिकाच्या वाढीवर परिणाम झाला. पिके पिवळी पडून कुजून गेली. कंदकूज, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पिकाची आणि कंदाची वाढ थांबली. परिमाणी हळदीच्या उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा : सात वर्षांनी शुक्रवार ठरला जानेवारीमधील सर्वाधिक उष्ण दिवस, सांताक्रूझ येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
उत्पादनात घट येणार
यंदाच्या हंगामात लागवड काळात पाण्याची टंचाई होती. हळद लागवड पट्ट्यात तापमान ३५ अंश सेल्सिअसहून जास्त होते. त्यानंतर जूनपासून सतत पाऊस होत राहिला. अति उष्णता, अति पावसाचा हळद लागवडीवर परिणाम झाला. संततधार पावसामुळे रोगांच्या प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात घट येण्याचा अंदाज आहे, असा अंदाज कसबेडिग्रज, (जि. सांगली) येथील हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांनी व्यक्त केला.