मुंबई : ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या विणीचा हंगाम सध्या सुरू असून, कोकणातील काही समुद्रकिनाऱ्यांवर कासव महोत्सव भरविण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुणगे – आडबंदर येथे पहिल्यांदाच कासव महोत्सव भरविण्यात आला होता. या महोत्सवादरम्यान १०० हून अधिक कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.

भारतीय उपखंडात चार ते पाच प्रकारच्या कासवांचा वावर आढळतो. त्यात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्स बिल टर्टल आणि लेदर बॅक टर्टल या सागरी कासवांच्या प्रजातींचा समावेश आहे. प्रामुख्याने ग्रीन टर्टल आणि ऑलिव्ह रिडले या कासवांच्या प्रजाती कोकण किनारपट्टीवर आढळतात, रत्नागिरी जिल्ह्यांतील १७, तर, रायगड जिल्हयात ४ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ किनाऱ्यांवर कासव संवर्धन मोहीम राबवण्यात येत आहे. मुणगे -आडबंदर येथे प्रथमच ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. वनविभाग, कांदळवन कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने हा कासव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात १५० कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. पहिलाच प्रयत्न यशस्वी झाल्याने यापुढे ही मोहीम कायमस्वरूपी राबविण्याचा विचार आहे.

दरम्यान, अतिसंरक्षीत श्रेणीतील ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी निसर्गप्रेमी व वन विभागाच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीवर सुरू झालेल्या या चळवळीला यंदा तब्बल बावीस वर्षे पूर्ण होत आहेत.

गतवर्षी एक लाखाहून अधिक पिल्ले समुद्रात सोडली

गतवर्षी (२०२४) कोकण किनारपट्टीवरून तब्बल १ लाख ५८ हजार ८७३ कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती. किनाऱ्यांवर एकूण २ हजार ५६६ घरटी आढळली होती. दरवर्षी पिल्ले आणि घरट्यांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती पर्यावरणतज्ज्ञांनी दिली.

गुहागरने पटकावला पहिला मान

यंदाच्या विणीच्या हंगामात प्रथम गुहागरमधून कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. यात गुहागरने पटकावला पहिला मान पटकावला. हंगामातील पहिले घरटे गुहागरमध्ये नोव्हेंबर महिन्यात सापडले होते. त्यातून बाहेर पडलेल्या पिल्लांना यंदा जानेवारी महिन्यात समुद्रात सोडण्यात आले.

हरिहरेश्वरचाही समावेश

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावरून दुर्मिळ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची ८९ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. हरिहरेश्वर येथे कासवांच्या अंड्यांचे संरक्षण करण्यात येत आहे. अंड्यांतून बाहेर पडणारी कासवे टप्प्याटप्प्याने समुद्रात सोडली जाणार आहेत. नामशेष होत चाललेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची मोहीम गेली २० वर्षे हरिहरेश्वर येथे राबवण्यात येत आहे. हरिहरेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावर २० वर्षांपासून सागरी कासवांचे संवर्धन करण्याची मोहीम वन विभाग, पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांच्या सहयोगातून राबवण्यात येत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरअखेर किंवा मार्च, एप्रिलदरम्यान कासव अंडी देण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर येतात.

कसा लागतो कासवांचा माग

प्रामुख्याने नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी कासवांचा प्रजननकाळ असतो. या काळात रात्री भरतीच्या वेळी मादी समुद्रकिनाऱ्यावर येते. पाण्यापासून अंदाजे ५० ते ८० मीटर अंतरावर सुमारे दीड ते अडीच फूट खोल खड्डा करून मादी त्यामध्ये अंडी घालते. या खड्डयावर पायांनी रेती लोटून ती समुद्रात निघून जाते.

अंडी घालून कासवे समुद्रात परत जाताना रेतीवर वैशिष्ट्यपूर्ण नक्षी रेखाटतात. मादी अंडी घालून समुद्रात परत गेल्यानंतर कासवांच्या संवर्धनाचे काम सुरू होते. नोव्हेंबर ते मार्च या काळात दररोज पहाटे संवर्धनाचे काम करणारे कार्यकर्ते किनाऱ्यावर येतात. कासवांनी किनाऱ्यावर केलेल्या विशिष्ट प्रकारच्या नक्षीचा माग काढत घरटी शोधतात.

रत्नागिरीतील ९०३ कासवांची पिल्ले समुद्रात मार्गस्थ

रत्नागिरीतील गणपतीपुळे पाठोपाठ यंदा गावखडी समुद्र किनाऱ्यावर देखील मोठ्या प्रमाणात कासवांच्या अंड्यांची घरटी सापडली. ती घरटी संरक्षित करण्याचे काम येथील प्राणीप्रेमींनी केले. या ठिकाणी संरक्षित करण्यात आलेल्या घरट्यांतील अंड्यांमधून कासवाची पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने ९०३ पिल्लांना समुद्रात सोडण्यात यश आले आहे.