शिकवणी वर्गाला जाते असे सांगून घरातून निघून गेलेल्या व घरी न परतलेल्या एका १२ वर्षांच्या मुलीचा बोरिवली येथील एमएचबी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या सहाय्याने मागोवा घेत केवळ आठ तासांत शोध घेतला. तिला रात्री उशिरा पालकांच्या ताब्यात दिले. शिकवणी वर्गातून नेहमीच्या वेळेत परत न आल्याने पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ती कोठेही आढळली नाही. घरात भांडण वा कुठलीही अनुचित घटना घडलेली नव्हती. तरीही ती मुलगी घरी परत न आल्याने रहिवाशांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
हेही वाचा >>>नवनीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित; मुंबईतील शिवडी न्यायालयाचा दणका
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके तयार करण्यात आली. ही पथके वेगवेगळ्या ठिकाणी तिचा शोध घेण्यासाठी पाठविण्यात आली. अन्य एक पथक रात्रभर सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या माध्यमातून तिचा संभाव्य ठावठिकाणा तपासत होते.संबंधित मुलीकडे मोबाईल नसल्यामुळे तपासात अडथळे येत होते. परंतु वेगवेगळे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून मुलीचा माग घेतला असता ती बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात असल्याची शक्यता वाटल्याने तेथे तिचा कसून शोध घेण्यात आला. अखेरीस एका ठिकाणी ती आढळून आली. तिला पालकांसमवेत पोलीस ठाण्यात आणून तिच्याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडला आहे की नाही याबाबत खात्री केली. तसेच तिची वैद्यकीय तपासणी करून तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
हेही वाचा >>>उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे लेखी युक्तिवाद सादर; खासदार अनिल देसाईंची माहिती; म्हणाले, “आम्ही…”
शिकवणीतील शिक्षिकेच्या भीतीमुळे आपण घरातून निघून गेल्याचे या मुलीने सांगितले. बोरिवली येथे बाहेरगावी जाणाऱ्या ट्रेनमधून जाण्याचा तिचा बेत होता. त्यापूर्वीच पोलिसांनी तिचा शोध लावला. मुलगी घरी आली नाही तेव्हा तिचे अपहरण झाले का किंवा लव्ह जिहादचे प्रकरण आहे का, असे वाटून पोलिसांनी तपास सुरू केला होता.