ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान झालेल्या सामन्यांवर संकेतस्थळाच्या माध्यमातून सट्टा घेणाऱ्या दोन सट्टेबाजांना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींकडून लॅपटॉप, मेमरी कार्ड, २१ मोबाइल जप्त करण्यात आले असून संकेतस्थळ मालकाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. संजय चंदनानी (२५) व मुकेश बिनवानी (४१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. मुळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले हे दोघेही कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात वास्तव्यास आहेत.
हेही वाचा >>>मुंबई: बनावट कागदपत्रांद्वारे ‘महारेरा’कडे नोंदणी करणाऱ्या ४९ विकासकांना दणका
कांदिवली येथील एका इमारतीत सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दहिसर येथील पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला असता दोन आरोपींच्या मोबाइलवर सट्टेबाजीचे संकेतस्थळ सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडील साहित्य जप्त केले. याप्रकरणी संकेतस्थळाच्या मालकाची ओळखही पटली असून त्यालाही याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय आरोपींकडील ४३ ग्राहकांची यादीही पोलिसांना मिळाली आहे. दोन मुख्य आरोपींसह ४३ ग्राहकांनाही याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणाचे धागेदोरे मध्य प्रदेशापर्यंत जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.