मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे चकमक प्रकरण आपल्याला पुढे लढायचे नाही. त्यामुळे ते बंद करण्यात यावे, अशी मागणी शिंदे यांच्या पालकांनी गुरुवारी उच्च न्यायालयात केली. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने शिंदे याच्या पालकांच्या मागणीची दखल घेतली. तसेच, तुमच्यावर कोणी दबाव आणला नाही ना ? अशी विचारणा त्यांना केली. त्यावर, आमच्यावर कोणाचाही दबाव नाही.
आम्हाला ताण आणि धावपळ सहन होत नाही. शिवाय, आमच्या सुनेला आताच बाळ झाले आहे आणि ती एकटी राहते. आम्ही तिच्याकडे राहायला जाणार आहोत, असेही शिंदे याच्या पालकांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, अक्षय याचे चकमक प्रकरण आपल्याला पुढे लढायचे नाही. त्यामुळे ते बंद करण्यात यावे या विनंतीचा त्याच्या पालकांनी पुनरुच्चार केला. त्यानंतर, न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी उद्या ठेवली.
बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आरोपी अक्षय शिंदेची कथित चकमक करण्यात आली होती. त्याविरोधात त्याच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणातील मूळ आरोपींना वाचविण्यासाठी अक्षयची चकमक केल्याचा आरोप त्यांनी केला होता व प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणी केली होती.