मुंबई : मुंबईत उष्णता वाढत असून प्रवाशांचा वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढत आहे. वातानुकूलित लोकलचा पास आणि तिकीटासाठी जादा पैसे मोजून प्रवासी प्रवास करीत आहेत. मात्र, मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या खोळंब्याने प्रवाशांचे पासचे पैसे वाया गेले आहेत. याबाबत प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधील बिघाडाने मंगळवारी दोन वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्या.
हेही वाचा >>> अन्न व औषध प्रशासनातही पोलिसांप्रमाणे गणवेश? राज्य शासनाला प्रस्ताव सादर
मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकात मंगळवारी वातानुकूलित लोकल आली. त्यावेळी या लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे प्रवाशांना समजले. त्यानंतर दोन प्रवाशांनी वातानुकूलित लोकलचा दरवाजा बंद होऊ दिला नाही. लोकलचा दरवाजा उघडाच ठेवून, लोकल पुढे नेण्याची मागणी प्रवासी करीत होते. मात्र घटनास्थळी आरपीएफ जवान येऊन, त्यांनी प्रवाशांना दरवाज्यावरून हटवले आणि वातानुकूलित लोकल मार्गस्थ केली. मात्र, ही लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावली. परिणामी, त्याचा फटका प्रवाशांना बसला.
हेही वाचा >>> क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
सीएसएमटीवरून मंगळवारी दुपारी २.०३ वाजता ठाण्याला जाणाऱ्या लोकलची अनेक प्रवासी वाट पाहत होते. मात्र या लोकलऐवजी सामान्य लोकल चालवण्यात आली. वातानुकूलित लोकलची फेरी रद्द झाल्याने, प्रवाशांनी समाज माध्यमावर तीव्र नापसंती व्यक्त केली. तसेच पासाचे पैसे वाया गेल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, सकाळच्या घटनेबाबत कल्याण आरपीएफ ठाण्याकडून दोन प्रवाशांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर, दुरुस्तीच्या कारणास्तव वातानुकूलित लोकल रद्द झाली, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.