घरफोडीच्या गुन्ह्यांत सहभागी दोन आरोपींना अटक करण्यात बोरिवलीमधील एमएचबी पोलिसांना यश आले आहे. दिनेश गणपत मोरे ऊर्फ शॉन ऊर्फ बिल्डर बाऊन्सर आणि विक्रांत ऊर्फ विकी शंकर कदर अशी या दोघांची नावे आहेत. आरोपींनी आधी घराची पाहणी केली आणि त्यानंतर चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा >>>मुंबई महानगरपालिकेचा ‘आरोग्यम् कुटुंबम्’ कार्यक्रम; वर्षभरात ४७ टक्के नागरिकांची करणार आरोग्य तपासणी
५१ वर्षांची तक्रारदार महिला दहिसरच्या गावठण परिसरात राहत असून तिच्या पतीचे निधन झाले आहे. तिच्या तिन्ही मुली विवाहित असून त्या त्यांच्या सासरी राहतात. त्या वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बांगड्या बनविण्याची एक कंपनी असून तिथेच त्यांची एक मुलगी कामाला आहे. २७ ऑक्टोंबर रोजी दिवाळी असल्याने महिला तिच्या वसई येथील भावाकडे गेल्या होत्या. यावेळी घरी कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरांनी तिच्या घरात प्रवेश केला होता. कपाटातील २५ हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे एक लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लुटून पलायन केले होते. हा प्रकार कामावर आलेल्या तिच्या मुलीच्या निदर्शनास येताच तिने आईला याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर या महिलेने एमएचबी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना तीन महिन्यांनंतर याप्रकरणी दिनेश मोरे आणि विकी कदर या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.