मुंबई : अल्पवयीन मुलीवर चालत्या कारमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील दोन आरोपींना जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या निकृष्ट तपासावर ताशेरे ओढले. तसेच या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालण्याचे आदेश देऊन तपास अधिकाऱयावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराचा आरोप असलेल्या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणाच्या तपासात मानखुर्द पोलिसांनी केलेल्या हलगर्जीमुळेच आरोपींना जामीन मंजूर करावा लागत असल्याचे ताशेरेही न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने ओढले.

हेही वाचा >>> मुंबई : वातानुकूलित लोकल, प्रथम श्रेणीच्या डब्यातील विनातिकीट प्रवाशांवर कारवाई; ८६ लाख रुपयांची दंडवसुली

मानुखर्द पोलिसांच्या हद्दीत २०२० मध्ये घडलेल्या या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपींनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्याविरोधात ठोस पुरावा नसल्याचा दावा आरोपींनी केला होता. शिवाय प्रकरणातील तिस-या आरोपीला काही दिवासंपूर्वी मंजूर झालेल्या जामिनाचा आधार आरोपींनी जामिनाची मागणी करताना केला होता.

हेही वाचा >>> मुंबई : चार लोकलवर दगडफेक,आरोपीला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

आरोपींना कधीच पाहिले नसल्याचे आणि तिन्ही आरोपी एकमेकांना टोपण नावाने हाक मारत होते, असे प्रकरणातील अल्पवयीन पीडितेने दंडाधिका-यांना दिलेल्या जबाबाच्या वेळी सांगितले होते. असे असताना तपास अधिका-याला आरोपींची ओळख नीट तपासून घेण गरजेचे वाटले नाही. पोलीस निरिक्षक पदावरील या अधिका-याने अल्पवयीन पीडितेला पोलीस ठाण्यात बोलावून आरोपींची ओळख पटवली होती. अशा प्रकारे अल्पवयीन मुलीला आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावणे हेच चुकीचे असल्याचे ताशेरेही न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवताना ओढले. अल्पवयीन मुलीवर चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे. असे असतानाही तपास अधिका-याने गाडी हस्तगत केल्यानंतर ती न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवली नाही. त्याला तसे करणे गरजेचे वाटले नाही. त्यामुळे आरोपींविरोधात ठोस पुरावा नाही. पोलिसांनी सीएनजी पंपावरील कर्मचा-याचा जबाब नोंदवला. त्यात त्याने आरोपींची गाडी घटनेच्या रात्री पंपावर आल्याचे तसेच गाडीत अल्पवयीन मुलगी बसली होती, असेही सांगितले. तक्रारदार मुलीला गाडीत बळजबरीने बसवल्याचे पोलिसांच्या तपासात कुठेच नमूद करण्यात आलेले नाही. पोलिसांनी तपासात केलेल्या हलगर्जीमुळे पोक्सो अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात आरोपींना जामीन मंजूर करावा लागत असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली.

Story img Loader