मुंबई : समाज माध्यमांवर भीतीदायक चित्रफीत टाकून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा आणि अफवा पसरवण्याचा प्रयत्न बुधवारी ट्रॉम्बे परिसरात काही समाजकंटकांनी केला. ट्रॉम्बे पोलिसांनी वेळीच दखल घेत याप्रकरणी दोघांना अटक केली. गेल्या काही दिवसांपासून काही जण समाजमाध्यमांवर अफवा पसरवत असून यातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
हेही वाचा >>> भांडुपमध्ये जलवाहिनीला गळती; अनेक भागांमधील पाणीपुरवठा खंडित
बुधवारी ट्रॉम्बे परिसरातील दोन व्यक्तींनी समाजमाध्यमांवर काही पोस्ट टाकून भीती आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ट्रॉम्बे पोलिसांनी तत्काळ याबाबत तपास करून ट्रॉम्बे परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. समाजमाध्यमांवर टाकलेला संदेश अफवा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. नागरिकांनी आशा प्रकारच्या कुठल्याही चित्रफिती अथवा संदेश समाजमाध्यमांवर टाकू नयेत, असे आवाहन परिमंडळ ६चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी केले आहे. अशा संदेश टाकणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.