मुंबईः शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची समाज माध्यमांवर मॉर्फ केलेली चित्रफीत प्रसारीत केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांना अटक केली. शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशोक मिश्रा व मानस कुवर अशी अटक आरोपींची नावे आहेत. दहिसर पोलीस ठाण्यात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकृष्णनगर परिसरात शनिवारी रात्री विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी श्रीकृष्णनगर येथून अशोकवन जंक्शन, दहिसर पूर्व, मुंबईपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अशोकवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याचे आयोजन मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून करण्यात आले.  त्या कार्यक्रमातील रॅलीतील ती चित्रफीत मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आल्याने शीतल म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

हेही वाचा >>> मुंबईः ट्रामाडॉलच्या तस्करीप्रकरणी सीमाशुल्क विभागाकडून एकाला अटक

या चित्रफीतीबाबत शीतल म्हात्रे यांनी ट्वीट करत भूमिका स्पष्ट केली. “राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबूक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ व्हिडीओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?”  हे व्हिडीओ व्हायरल करणारे कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे. विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रिला अशा पद्धतीने बदनाम करू शकतात. भावा-बहिणीचे नाते असलेल्या एखाद्या स्त्री-पुरुषाला समाज विकृत नजरेने बघतो आहे. यामागे कुणाचे डोके आहे आणि कोण करते आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे,” असे मत शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested dahisar police case of morph tapes shinde group sheetal mhatre complaint mumbai print news ysh