मुंबई: लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून मानखुर्दमधील ६५ महिलांच्या नावे कर्ज घेतल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
मानखुर्द परिसरात राहणाऱ्या काही महिलांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन येथील काही आरोपींनी ६५ महिलांची फसवणूक केली. महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळून देण्याचे आमिष दाखवून आरोपीनी त्यांच्या नावे कर्ज घेऊन त्या महागडे मोबाइल खरेदी केले. कर्ज देणाऱ्या खासगी कंपनीतील एका अधिकाऱ्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी याप्रकरणी मंगळवारी मानखुर्द परिसरातून सुमित गायकवाड (३२) आणि चेंबूर परिसरातून राजू बोराडे (४५) यांना अटक केली. या दोघांनी महिलांची कागदपत्रे जमा करून त्यांच्या साथीदारांना दिली होती. त्यानंतर या महिलांच्या नावे कर्ज घेऊन महागडे मोबाइल खरेदी करण्यात आले होते. कर्चाच्या रकमेतून खरेदी केलेले महागडे मोबाइल अन्य व्यक्तींना कमी किमतीत विकण्यात आले आहेत. त्यामुळे मानखुर्द पोलीस मोबाइलची विक्री करणाऱ्या आणि मोबाइल विकत घेणाऱ्यांचा शोध घेत आहेत.