एटीएममधून बनावट कार्डद्वारे रोख रक्कम काढणाऱ्या दोघांना अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. आरिफ रत्ती खान आणि राशिद फिरोज खान अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी याच गुन्ह्यांत त्यांच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली होती.
हेही वाचा- परळ टीटी पुलाच्या दुरुस्तीसाठी १८ कोटी; पुलावरील सांध्यांची संख्या कमी करण्याचा महापालिकेचा निर्णय
तक्रारदार निकुंज अरविंद सरेया हे एका खाजगी बँकेत व्यवस्थापक असून सध्या ते अंधेरीतील मरोळ परिसरातील बँकेच्या शाखेत कामाला आहेत. बँकेच्या दक्षता पथकाने १० ऑक्टोबर रोजी मरोळच्या एटीएम सेंटरमध्ये ५ लाख ६० हजार ५०० रुपये कमी दाखवत असल्याचे सांगितले होते. या घटनेची निकुंज सरेया यांनी गंभीर दखल घेत चौकशी सुरु केली होती. या चौकशीत ५ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वादोन ते रात्री बाराच्या दरम्यान एटीएममधून विविध बँकांचे एटीएम कार्ड क्लोन करुन त्या द्वारे ४९ व्यवहार झाले असून प्रत्येकी दहा हजाराप्रमाणे एटीएममधून ४ लाख ९० हजार रुपये काढण्यात आल्याचे समोर आले. अशाच प्रकारे ६ ऑक्टोबरला पाच एटीएम कार्ड क्लोन करुन ५० हजार आणि इतर दोन व्यवहारातून वीस हजार रुपये काढण्यात आले होते. सीसीटिव्ही चित्रिकरणाची तपासणी केल्यानंतर ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान सहा ते सात लोकांची हालचाल संशयास्पद वाटत होती. या व्यक्तींनी विविध एटीएम कार्ड क्लोन करुन या कार्डाद्वारे एटीएममधून ५ लाख ६० हजार रुपयांची रोख काढली.
हेही वाचा- मुंबई: दारू चोरल्याप्रकरणी दोघांना अंधेरी पोलिसांकडून अटक
या चार अज्ञात व्यक्तींनी चार दिवसांत विविध एटीएममधून बनावट कार्डद्वारे सुमारे साडेसहा लाख रुपये काढल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन दिवसांत एका आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडून १ लाख ६२ हजार रुपयांची रोख जप्त केली आहे. त्याच्या चौकशीतून आरिफ आणि राशिद या दोघांची नावे उघड झाली होती.