लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: सव्वा कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून दोघांना अटक केली. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. सोने लपवलेला पुडा आरोपींच्या साथीदाराने आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानतळ परिसरात फेकला होता. तो स्वीकारण्यासाठी दोघे जण आले असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्यांना पकडले.

वाय जलालुद्दीन व संजीता बेगम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही चेन्नईतील रहिवासी आहेत. १२ सप्टेंबरला विमानतळावर पुडे फेकले होते. त्यात मेणात सोन्याची भुकटी लपवलेली आढळली. अशा सहा मेणबत्त्या त्या पुड्यात सापडल्या असून त्यात २५३४ ग्रॅम सोन्याची भूकटी सापडली. त्या सोन्याची किंमत सव्वा कोटी रुपये आहे. ते सोने स्वीकारण्यासाठी दोघेही आले होते. ते सोने मुंबई विमानतळावरून ते तामिळनाडूमध्ये नेणार होते.

आणखी वाचा-“आरक्षण म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नव्हे, हजारो वर्षे…”; छगन भुजबळ यांचे वक्तव्य

आरोपींच्या चौकशीत त्यांना एक अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तींने त्यांना सोने स्वीकारण्यासाठी सांगितले होते. सोन्याच्या तस्करीसाठी पैसे मिळणार होते. पण त्यापूर्वीच त्यांना विमानतळावर पकडण्यात आले. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात सीमाशुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय असून सीमाशुल्क विभाग त्याबाबत तपास करत आहे.

गेल्या आठवड्यात सीमाशुल्क विभागाने श्रीलंकेतील दोन नागरिकांसह तिघांना सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक केली होती. आरोपी याच कार्यपद्धतीचा वापर करून सोन्याची तस्करी करत होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested from mumbai airport in connection with gold smuggling mumbai print news mrj
Show comments