लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : नागपाडा येथे इमारतीच्या तळघरातील पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याप्रकरणी सर जे.जे. मार्ग पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन सुपरवाझरना पोलिसांनी अटक केली आहे. कामगारांना कोणतेही सुरक्षा उपकरण न दिल्याने निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी सर. जे.जे. मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

अब्दुल दालिम शेख(३५) व अनिमश विश्वास(३३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही पर्यवेक्षक असून ते नागपाडा परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी स्वतः याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सर. जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार धनराज झिपरू महाले यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस पथकाने नागपाडा परिसातून दोघांना ताब्यात घेतले. तक्रारीनुसार, इमारतीचे तळघर बरेच दिवसांपासून बंद होते. त्यानंतरही कोणतीही तपासणी न करता आरोपींनी कामगारांना साफसफाईसाठी टाकीत उतरवले. तसेच कामगारांना टाकीत उतरवताना त्यांना कोणतेही सुरक्षा उपकरण पुरवण्यात आले नव्हते. त्यामुळे कामगारांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपींना रविवारी मध्यरात्री अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

नागपाड्यातील डिमटीमकर मार्गावरील बिस्मिल्ला स्पेस या निर्माणाधीन इमारतीतील तळघरात असलेल्या पाण्याच्या टाकीची अनेक महिन्यांपासून स्वच्छता झाली नव्हती. त्यामुळे टाकी स्वच्छ करण्याचे कंत्राट सोसायटीने एका खाजगी कंपनीला दिले. त्या कंपनीचे कामगार टाकी स्वच्छ करण्यासाठी रविवारी दुपारी खोल टाकीत उतरले. मात्र, टाकीतील अपुऱ्या प्राणवायूमुळे काहीवेळातच त्यांचा श्वास गुदमरला. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. त्याचबरोबर, रुग्णवाहिका, पोलीस आणि संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही दुर्घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच कामगारांना बाहेर काढले आणि उपचारासाठी नजीकच्या जे. जे रुग्णालयात दाखल केले. मात्र, या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला. हसीबुल शेख (वय १९), राजा शेख (वय २०), जिउल्ला शेख (वय ३६), इमांदू शेख (वय ३८) अशी मृत कामगारांची नावे आहेत. या कामगारापैकी पुरहान शेख (वय ३१) याचीही स्थिती गंभीर असून त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.