मुंबईतील सांताक्रूझ पूर्व परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन रिक्षाचालकांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. विशेष म्हणजे पीडित पोलीस कर्मचारी पोलिसांच्या गणवेशात असूनही आरोपींनी त्यांना भररस्त्यावर मारहाण केली. या मारहाणीत संबंधित पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात दुखापत झाली आहे. याप्रकरणी दोन आरोपी रिक्षाचालकांना अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास वाकोला पोलीस करत आहेत.
प्रदीप जगदाळे (३९) असं मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते वाकोला पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. या मारहाणीप्रकरणी रिक्षाचालक आरिफ अदाम अली शेख (३३) आणि भाऊ सद्दाम अदाम अली शेख (३२) यांना अटक केली आहे. वाकोला पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर ही घटना घडली.
वाकोला पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पोलीस कर्मचारी प्रदीप जगदाळे यांनी आरोपी रिक्षाचालकांना प्रवाशी घेण्यास नकार दिल्याबद्दल विचारणा केली होती. या कारणातून पोलीस आणि दोन्ही आरोपींमध्ये बाचाबाची व शिवीगाळ झाली. हा वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी पोलीस कर्मचारी प्रदीप जगदाळे यांना मारहाण केली. या प्रकारानंतर जवळच असलेल्या वाकोला पोलीस ठाण्यातील इतर पोलीस जगदाळे यांच्या मदतीसाठी धावून आले.
दोन्ही आरोपींना घटनास्थळावरून अटक केली आहे. यातील एका आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून एका हत्येच्या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.