मुंबई – बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यंदा मे अखेरीपर्यंत मुंबई पोलिसांनी ५०९ गुन्हे नोंदवले आहेत. गेल्यावर्षी याच काळात ४६५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. दिवसांतला सर्वाधिक काळ मुले व्यतीत करतात त्या शाळा, शिकवण्याही सुरक्षित नसल्याचे दिसते आहे. मुंबईतही गेल्या आठवड्यात शिक्षकांनीच विद्याथ्यर्ांव लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. कांदिवलीतील एका शाळेत अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला तर धारावी येथे एका शिकवणी शिक्षकाने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला. त्या दोन्ही प्रकरणांत गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबईत आठवड्याभरात दोन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. कांदिवलीमधील एका शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात १४ ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने पीडित मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगून स्वतः या प्रकरणी कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत १४ वर्षाच्या विद्यार्थ्याचे दोन्ही हात चादरीने बांधून त्याचा लैंगिक छळ करणाऱ्या ३७ वर्षीय खासगी शिकवणी शिक्षकाला धारावी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती.
हेही वाचा >>>मुलीच्या पोटातून काढला केसांचा गुंता; वाडिया रुग्णालयात यशस्वी उपचार
आरोपीने पीडित मुलाला अश्लील चित्रफीत दाखवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने शिक्षकाने अभ्यास घेण्याच्या बहाण्याचे पीडित मुलाला शिकवणीच्या ठिकाणी बोलावले. त्यानंतर मोबाईलमध्ये त्याला अश्लील चित्रफीत दाखवून चादरीने त्याचे हात बांधून त्याच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे.मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार यावर्षी मे महिन्यापर्यंत पोक्सो अंतर्गत ५०९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात बलात्काराच्या २३२, विनयभंगाच्या २६२, छेडछाडीचे १२ व इतर ३ गुन्ह्यांचा समावेश आहे. पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांहून अधिक आहे. गेल्यावर्षी याच काळात पोक्सो कायद्या अंतर्गत ४६५ गुन्ह्यांची नोंद झाली होती.