मुंबईच्या वडाळा येथील म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ मोनोरेलच्या दोन डब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. या आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण मिळवण्यात यश आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे मोनोरेलची सेवा ठप्प झाली असून त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

वडाळ्याहून चेंबूरला जाणाऱ्या मोनोरेलच्या दोन डब्यांना पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी आग लागली. म्हैसूर कॉलनीजवळ ही घटना घडली. आग लागल्याचे समजताच अग्निशमल दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. मात्र या दुर्घटनेमुळे मोनोरेलची वाहतूक ठप्प झाली आहे.

आग विझवण्यात आल्यानंतर मोनोरेल कारखान्यात नेण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या मार्गावरील वाहतूक लवकरच पूर्ववत होईल, असे मोनोरेल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र याआधी अनेकदा दुर्घटना झाल्यावर मोनोरेलची सेवा पूर्ववत होण्यास कित्येक तास लागत असल्याचे दिसून आले आहे. काही वेळा मोनोरेलची सेवा सुरळीत होण्यास एक दिवसाचा कालावधीही लागला आहे.

Story img Loader