अंदमानमधील पोर्टब्लेअर येथे रविवारी ‘अॅक्वा मरीन’ बोटीला झालेल्या अपघातात ठाणे येथील दोन दाम्पत्य मृत्यूमुखी पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मुंबईतील मुलुंड येथील ‘सावरकराईट्स’ या गटातर्फे ही दोन दाम्पत्य अंदमान येथे गेली होती. या अपघातात मृत पावलेल्या चंदू भोसेकर आणि त्यांच्या पत्नी अलका भोसेकर यांचे मृतदेह ठाण्यात आणण्यासाठी ठाण्याचे आमदार राजन विचारे आज (सोमवार) अंदमान येथे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या अपघातात ठाण्याचील वैद्य हे आणखी एक दाम्पत्य बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
भोसेकर दाम्पत्याचा मृत्यू ही अतिशय दु:खद बाब असल्याचे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र अजय जोशी पीटीआयशी बोलताना म्हणाले. अंदमान येथील भाजप कार्यालयातील कर्मचारी अंदमान येथे भोसेकर कुटुंबीयांना मदत करण्यासाठी तेथील रूग्णालयात गेले असल्याची माहितीही जोशी यांनी दिली.
भोसेकर यांचे बंधू अच्यूत भोसेकर हेदेखिल अंदमान येथे दाखल झाले आहेत.
हे सर्व पर्यटक २४ जानेवारीला मुंबई येथून अंदमान येथे गेले होते आणि पुढील दोन दिवसांमध्येच ते मुंबईला परतणार होते.
भोसकर यांच्या पश्चात एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. बेडेकर हायस्कूलचे विद्यार्थी असलेले चंदू भोसेकर हे भाजपचे अंमलदार होते. तसेच भोसकर हे महाराष्ट्र मेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचे सदस्य आणि अतिशय कार्यरत रोटेरीयनदेखिल होते.
माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी भोसेकर यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले असून गेल्या वीस वर्षाच्या मैत्रीचा इतका करूण अंत होईल असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
फोटो प्रातिनिधीक आहे.