कर्करोगावरील उपचारांमधील बदलांसदर्भात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीने दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजिण्यात आले आहे. यानिमित्ताने कर्करोगावर किमान जागेत करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया पाहण्याची संधी भारतातील शल्यविशारदांना मिळणार आहे.
शनिवार ८ आणि रविवार ९ जून रोजी चेंबूर येथील संस्थेमध्ये हे चर्चासत्र होणार असून भारत आणि आशिया खंडातील सुमारे ३०० हून अधिक शल्यविशारद या चर्चासत्रामध्ये सहभागी होतील. भारतामध्ये कर्करोगासाठी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेविषयी जागृती करणे हा या चर्चासत्राचा प्रमुख उद्देश असल्याचे या चर्चासत्राचे आयोजक डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले. यावेळी कोलन, रेक्टल, अन्ननलिका आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांवर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया दाखविण्यात येणार आहेत. या सर्जरीसंबंधीच्या नव्या पद्धतीची माीिहती देणे आणि रुग्णांना या तंत्रज्ञानाची कार्यक्षमता दाखविणे हाही या चर्चासत्राचा उद्देश आहे.