मुंबई : मध्य रेल्वेवरील कसारा स्थानकावर उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. हा ब्लाॅक शनिवारी, रविवारी तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहे. शनिवारी सकाळपासून या ब्लाॅकला सुरुवात होईल. या ब्लाॅकमुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. तसेच कसारा येथे येणाऱ्या लोकल अंशत: रद्द करण्यात येणार असून कसारा – आसनगाव दरम्यानचालोकल प्रवास करणे कठीण होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेवरील पहिला ब्लाॅक शनिवारी सकाळी ११.४० ते दुपारी १२.१० पर्यंत कसारा स्थानकाच्या अप आणि डाऊन मार्गावर असेल. तर, दुसरा आणि तिसरा ब्लॉक रविवारी सकाळी ११.४० ते दुपारी १२.१० आणि दुपारी ४ ते दुपारी ४.२५ या वेळेत कसारा स्थानकाच्या अप आणि डाऊन मार्गावर घेण्यात येणार आहे. ब्लाॅक कालावधीत शनिवारी आणि रविवारी सकाळी ९.३४ वाजता सीएसएमटी येथून सुटणारी कसारा लोकल आसनगावपर्यंत चालवण्यात येईल. तर, आसनगाव – कसारा दरम्यान ही लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.

रविवारी दुपारी १.१० वाजता सीएसएमटी येथून सुटणारी कसारा लोकल कल्याणपर्यंत चालवण्यात येईल. तर, कल्याण – कसारादरम्यान ही लोकल रद्द करण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवारी सकाळी ११.१० वाजता कसारा येथून सुटणारी सीएसएमटी लोकल आसनगाव येथून सुटेल. त्यामुळे कसारा – आसनगावदरम्यान ही लोकल उपलब्ध नसेल. शनिवारी आणि रविवारी दुपारी ४.१६ वाजता कसारा येथून सुटणारी सीएसएमटी लोकल कल्याण येथून सुटेल. त्यामुळे कसारा – कल्याण दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.