लालबाग उड्डाणपुलावर दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. दुचाकी रस्त्याच्या संरक्षक भींतीवर धडकल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी भरधाव वेगाने दुचाकी चालवून स्वतः व मागे बसलेल्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश सालकर (२५) व शैलेश सैद (४०) अशी मृतांची नावे आहेत.
हेही वाचा >>> केईएम, शीव, नायर व कूपरमध्ये महिनाभरात अत्याधुनिक एमआरआय यंत्रणा
दोघेही साकीनाका येथील रहिवासी आहेत. सहाय्यक फौजदार सुधाकर माने (५४) यांच्या तक्रारवरून चालक सालकरविरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालबाग उड्डाणपुलावर अपघात झाल्याची माहिती काळाचौकी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी गेले असता पुलाच्या संरक्षण भींतीवरील लोखंडी रोलिंगला एक व्यक्ती अडकली होती. दुसरी व्यक्ती रस्त्यावर पडलेली दिसली. पोलिसांनी तात्काळ भिंतीवर अडकलेल्या व्यक्तीला खाली काढले. दोघांनाही जे.जे. रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दुचाकी भरधाव वेगाने चालवत पुलाच्या दिशेने गेले होते. वेगामुळे वाहनावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.