घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवर रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका अज्ञात इसमासह एका युवकाचा मृत्यू झाला. दोन्ही अपघातातील वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाले.
पहिला अपघात दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. एक ५५ वर्षीय इसम घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्याला धडक दिली. जखमी अवस्थेतील या व्यक्तीला तिथेच सोडून डंपर चालक घटनास्थळावरून फरार झााला. जखमी व्यक्तीला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
दुसरा अपघात याच मार्गावर संध्याकाळी साडेसहा वाजता घडला. अलाउद्दिन सवात (१६) हा युवक रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने त्याला धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. अलाउद्दिन बैंगनवाडी येथे राहणारा होता. या अपघातामध्येही ट्रेलरचालक ट्रेलर घटनास्थळावर सोडून फरार झाला.