लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन सराईत आरोपीना पोलीस उपायुक्त परिमंडळ सहाच्या पथकाने चुनाभट्टी आणि वलसाड येथून अटक केली. या आरोपींच्या ताब्यातून तब्बल १० कोटी रुपयांचे चरस पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ एप्रिल रोजी पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी रहीम शेख (३०) परिसरात संशयास्पद फिरताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याजवळ दोन कोटी रुपये किमतीचे चरस सापडले. पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने गुजरातमधील वलसाड येथून चरस आणल्याचे सांगितले. त्यानुसार परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी एक पथक तयार केले आणि वलसाडला पाठवले.

पोलिसांनी वलसाड येथे सापळा रचून नितीन तंडेल (३२) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून आठ कोटी रुपये किंमतीचा चरस जप्त केला. चुनाभट्टी आणि वलसाड येथे केलेल्या कारवाईतून पोलिसांनी तब्बल १० कोटी रुपये किंमतीचा चरस जप्त केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.