मुंबई : कर्नाटक राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या गरुडा, ऐरावत, अंबारी यांसारख्या प्रतिष्ठित लांब पल्ल्याच्या सेवांप्रमाणे महाराष्ट्रातही एसटीद्वारे अशी सेवा सुरू करण्यासाठी, एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळाने ठोस योजना आखली आहे.
एसटीला उभारी देण्यासाठी दोन तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू आहेत. बांधकाम क्षेत्रातील आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, एसटीची आर्थिक गणिते सुधारण्यास मदत केली जाईल.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी विविध संकल्पना मांडण्यात येत असून, त्याची अंमलबजावणी केली जात आहे. परंतु, एसटी महामंडळाच्या तिजोरीत वाढ होत नसल्याने, आता एसटीने तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, उत्पन्नवाढीवर भर देण्याचे ठरवले आहे.
एसटीच्या पडीक मोकळ्या जागा विकसित करण्यासाठी व प्रवाशांच्या सेवेत अत्याधुनिक नवीन एसटी बस सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार बांधकाम आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.
विजेवर चालणाऱ्या २२० आणि स्वमालकीच्या १,२०० बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यामुळे याबाबत तज्ज्ञांचा विशेष सल्ला मिळाल्यास एसटीची आर्थिक बाजू सक्षम होण्यास मदत होण्याची आशा आहे.
दरम्यान, एसटीला उभारी देण्यासाठी सल्लागार नेमण्याची संकल्पना चांगली आहे. पण सल्लागार कंपन्यांचा यापूर्वीचा अनुभव चांगला नाही. त्यातून फारशी सुधारणा झाली नाही. परंतु, आता पुन्हा नव्याने हा प्रयोग सुरू झाला आहे. परिवहन मंत्री तथा एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या कामाची पद्धत पाहता पुढे काही चांगले घडेल, अशी अपेक्षा आहे, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.
दोन सल्लागारांची नेमणूक
एसटी महामंडळाची राज्यभरात ८४२ ठिकाणी १,३६० हेक्टर जमीन उपलब्ध आहे. मात्र, अनेक वर्षांपासून ही जागा पडीक असून तिचा विकास होऊन त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळविण्यासाठी ही जागा ६० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याची योजना आहे. परंतु, यासाठी विकासक पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे राज्यातील एसटीच्या मोकळ्या जागांचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येऊन अपेक्षित उत्पन्न मिळविण्यासाठी व इतर अनेक योजनांसाठी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ राजन बांदेलकर आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील तज्ज्ञ सत्यजित पाटील या दोघांची एसटी महामंडळामध्ये सल्लागार पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची सल्लागार म्हणून नेमणूक केली जाणार आहे. याबाबत आज सोमवारी बैठक होणार असून याबाबत निर्णय घेण्यात येईल.-प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळ अध्यक्ष