मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रवाशांना सुविधा मिळावी आणि प्रवास सुकर व्हावा यासाठी ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेवर नऊ पादचारीपुलांच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरून मेट्रो स्थानकावर पोहोचणे प्रवाशांना सोपे व्हावे यासाठी बांधण्यात येत असलेल्या नऊपैकी राष्ट्रीय उद्यान आणि दिंडोशी येथील दोन पादचारीपुलांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आजपासून (गुरुवार) हे दोन्ही पूल पादचाऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहेत. आता मेट्रो स्थानकापर्यंत पोहचणे प्रवाशांसाठी सोपे होणार आहे.

हेही वाचा >>> …तर सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंचं सरकार पुन्हा स्थापन केलं असतं”; उज्ज्वल निकम यांनी सांगितली महत्त्वाची कायदेशीर बाब!

‘मेट्रो ७’ मार्गिका जानेवारीमध्ये पूर्ण क्षमतेने धावू लागली. आता ‘मेट्रो ७’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांना आणखी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पादचारीपूल बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार नऊ पूल बांधण्यात येत आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावरून मेट्रो स्थानकावर पोहचता यावे यासाठी हे पूल बांधण्यात येत आहेत. राष्ट्रीय उद्यान आणि दिंडोशी येथील पादचारीपूल गुरुवारपासून पादचाऱ्यांच्या सेवेत दाखल झाले. महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी या दोन्ही पुलाचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान पादचारीपूल ८३ मीटर लांब, तर चार मीटर रुंद आहे. तर दिंडोशी पादचारीपूल ११२ मीटर लांब आणि चार मीटर रुंद आहे. राष्ट्रीय उद्यान पुलामुळे द्रुतगती मार्गावरून राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकावर पोहोचणे सोपे होणार आहे, तर दिंडोशी पुलामुळे द्रुतगती मार्गावरून दिंडोशी मेट्रो स्थानकावर पोहचणे सोपे होणार आहे.