परदेशी बँकांतून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखालो लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या दोन ठकसेनांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. या ठकसेनांच्या कंपनीने मुंबईतील प्रख्यात ‘लकडावाला बिल्डर्स’ला २० कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून सुमारे ५० लाखांना गंडा घातला होता. या टोळीतील दोन परदेशी नागिरकांचाही पोलीस शोध घेत आहेत.
कमी वेळेत, कमी व्याजदरात परदेशी बँकांतून कर्ज मिळवून देऊ, अशी जाहिरात ‘डेल्टा फाईमलीज प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने अग्रगण्य वर्तमानपत्रात दिली होती. त्यासाठी मागाठणे येथील प्रशस्त कॉर्पोरेट कार्यालयही थाटले होते. मुंबईतील प्रख्यात ‘लकडावाला बिल्डर्स’चे संचालक मुसा लकडावाला यांनी जाहिरात वाचून कंपनीला संपर्क केला होता. कंपनीने बँकॉक येथील क्रेडिट फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीकडून २० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी ४ एप्रिल रोजी त्यांनी १ टक्के कमिशन आणि १ टक्का प्रोसेसिंग फी म्हणून ४६ लाख रुपये घेतले. कंपनीच्या ठकसेनांनी लकडावाला यांच्याबरोबर ब्रिटिश नागरिक डेव्हीड वेल्हम यांच्याशी बैठक आयोजित करून दिली. त्यांनी तारण म्हणून लकडावाला यांच्या ७ फ्लॅटची करापपत्रेही ठेवून घेतली होती. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरही ते कर्जाच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी टाळाटाळ करू लागले.
आपली फसवणूक होत आहे, असे लक्षात आल्यानंतर लकडावाला यांनी कस्तुरबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सोमवारी रात्री संजीव कुमार सिंग (३०) आणि साकेत शर्मा (३२) या दोघांना अटक केली. तर संजय शर्मा उर्फ संजय भारद्वाज तसेच ब्रिटिश नागरिक डेव्हीड वेल्हम आणि ख्रिस्तोफर फरार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा