ठाकरे गटाने मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मोर्चा काढला आहे. आदित्य ठाकरेंनी या मोर्चाचं नेतृत्व केलं आहे. मुंबई महापालिकेत मनमानी कारभार सुरु आहे अशी टीका आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर दुसरीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. ज्यांच्याकडे दोन पिढ्या मुंबई महापालिका होती तेच आज मोर्चा काढत आहेत असली नाटकं करु नका असं नवनीत राणांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे नवनीत राणांनी?

ठाकरे गटाचा मोर्चा घेऊन मुंबईत फिरत आहेत. मला वाटतं की आम्हीही मुंबईकर होतो. मुंबईत पाण्याचा प्रश्न होता, मुंबईत गंभीर प्रश्न आहेत. मॅनहोलमध्येही बळी गेले आहेत. जास्त पाऊस पडला तर रात्र, रात्र मुंबईकरांनी आहे त्या ठिकाणी काढली आहे. खूपच गंभीर परिस्थिती होती. दोन पिढ्या ज्यांच्याकडे मुंबई महापालिका होती त्यांनी मोर्चा काढावा? मला वाटतं आहे की लोकांना सगळं दिसतंय. लोक काही आंधळे नाहीत. लोक हे उन्हात चटके सहन करत मतदान करतात. लोकांना माहित आहे की मुंबई महापालिका गेल्या दोन पिढ्यांपासून ठाकरेंकडे आहे. उद्धव ठाकरे सगळा कारभार करत होते. हे काही करु शकले नाहीत आणि मोर्चा काढावा. मला वाटतं की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून शिकलं पाहिजे की स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला दोष द्यायचा. तसंच ही मोर्चाची नाटकं आता या ठाकरेंनी बंद करावीत” असंही नवनीत राणांनी म्हटलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर आज विराट मोर्चा निघाला आहे. मुंबई महापालिकेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. याच भ्रष्टाचारांच्या आरोपांवरुन ठाकरे गटाकडून आज मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आलाय. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. या मोर्चात सहभागी होण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर आदित्य ठाकरे मोर्चास्थळी दाखल झाले. या मोर्चासाठी ठाकरे गटाचे अनेक नेते दाखल झाले आहेत. मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळून हा मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र नवनीत राणांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two generations who owned the bmc are making drama of march in mumbai said navneet rana scj
Show comments