मुलींना होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांची वेळीच दखल घेऊन पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि समाज या विषयी जागरूक राहिला तर महिलांवरील अत्याचारांना मुळापासूनच कसे रोखता येईल, याचा अनुभव सोमवारी रात्री वांद्रे रेल्वे स्थानकातील एका घटनेमुळे आला. एका नर्सिगच्या विद्यार्थिनीला उद्देशून अश्लील शेरबाजी करणाऱ्या दोन तरुणांना प्रवाशांनीच चोप दिला. नंतर या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी तुरूंगात केली.
वडाळा परिसरात राहणारी ही मुलगी वांद्रय़ात एका नर्सिग महाविद्यालयात शिकते. त्यासाठी तिला वांद्रे ते वडाळा असा रेल्वेप्रवास करावा लागतो. गेले काही दिवस मेहाकरुल शेख (वय३५) आणि निजामुल मुसा लष्केर (वय२२) हे दोघे तरूण आपल्या काही मित्रांसमवेत या मुलीचा तिच्या घरापर्यंत माग काढत तिला त्रास देत होते.
या मुलीने या प्रकाराची तक्रार आपल्या एका मैत्रिणीकडे केली. या मैत्रिणीने एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या कानावर हा प्रकार घातला. या कार्यकर्त्यांने पोलिसांकडे तक्रार करून तिला होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री वांद्रे स्थानकामध्ये सापळा रचला. साडेनऊच्या सुमारास ही मुलगी जेव्हा स्थानकावर पोहोचली तेव्हा शेख आणि लष्केर यांच्यासोबत तरुणांचे टोळकेही स्थानकावर आले. ते तिला उद्देशून अश्लील शेरेबाजी करू लागले. पण, पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेण्याआधी आजूबाजूच्या प्रवाशांनीच चिडून त्यांना चांगला चोप दिला. त्यानंतर या दोघांना वांद्रे पोलिसांनी रितसर अटक केली.
महिलांवरील मानसिक व लैंगिक छळवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याने गेले काही महिने पोलिस या संबंधातील तक्रारी गांभीर्याने घेऊ लागले आहेत. अत्याचारांना कोणतीही दयामाया दाखवू नका, असे मुंबई पोलिस आयुक्तांचे स्पष्ट आदेशच आहेत. त्यामुळे, छेडछाडीच्या प्रकरणातही
पोलीस सतर्क राहून काम करू लागले आहेत.

Story img Loader