मुंबई : वाकोला येथे टेम्पो आणि दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याच्या सोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत. वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर चौक येथील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर गुरूवारी पहाटे हा अपघात झाला. टेम्पो आणि दुचाकीची परस्परांना धडक लागून झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली.
अपघातामुळे जोरदार आवाज झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. पायल वलेचा (२६) व चंद्रकांत अशोक सरदा (२६) अशी मृतांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून टेम्पो चालकाची ओळख पटली आहे. त्याचे नाव शिवजीतन यादव आहे. याबाबत पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.