कांजूर परिसरातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावर बुधवारी मध्यरात्री भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीने झाडाला धडक दिली. या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला, तर सात प्रवासी जखमी झाले. जखमींवर राजावाडी आणि वीर सावरकर रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>> वातानुकूलित लोकलला वाढता प्रतिसाद ; पश्चिम रेल्वेवर एकाच दिवसांत १८ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री

कुर्ला येथील कसाईवाडा परिसरात वास्तव्यास असलेले नऊ तरुण बुधवारी मध्यरात्री इनोव्हा गाडीने भिवंडीच्या दिशेने जात होते. मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास त्यांची गाडी पूर्व द्रुतगती मार्गावरील कांजूर मार्ग परिसरात पोहचली. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यालगत असलेल्या पिंपळच्या झाडावर आदळली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातग्रस्त गाडीत प्रवासी अडकले होते. विक्रोळी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जखमींना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर तात्काळ जखमींना राजावाडी आणि वीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>>“दबावाला बळी पडून…”, ऋतुजा लटकेंना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया!

या अपघातात चालक जुनेद कुरेशी (२६) आणि साहिल कुरेशी (१८) या दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर आयन कुरेशी (१८) याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतर सहाजण किरकोळ जखमी झाले आहेत. विक्रोळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Story img Loader