मुंबई – देशातील बेरोजगारीचे दाखले रोज नव्याने मिळत असून सरकारी नोकरीसाठी पदवीधरांच्या रांगा लागत आहेत. मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक पदाच्या एका जागेसाठी ११२ उमेदवार स्पर्धेत आहेत. पालिका प्रशासनाने घातलेल्या जाचक अटीमुळे ही पदभरती प्रक्रिया वादात सापडली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने अट वगळून नव्याने जाहिरात दिली होती. या पदभरतीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत १८४६ जागांसाठी तब्बल २ लाख ६ हजार ५८२ अर्ज प्राप्त आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. या जागांसाठी पूर्वी २० ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी उमेदवार दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात किमान ४५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालण्यात आली होती. महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही परीक्षेसाठी अशी अट नाही. त्यामुळे ही अट काढून टाकावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. कामगार संघटनांनीही हा विषय लावून धरला होता. आमदार आदित्य ठाकरे यांनीही याबाबत मागणी केली होती. त्याचप्रमाणे ही अट रद्द करावी असे लेखी आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने अखेर पात्रतेच्या निकषात बदल करून पहिल्या प्रयत्नांत उत्तीर्ण होण्याची अट रद्द केली होती. त्यानंतर अर्जांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

हेही वाचा – मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपये बोनस, आचार संहिता लागू होण्यापूर्वी तातडीने घोषणा

हेही वाचा – बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण: जुहू बीचवर काढलेल्या ‘त्या’ फोटोमुळे आरोपी अडकले; तिसऱ्या फरार साथीदाराचीही ओळख पटली!

पात्रतेचे निकष बदलल्यानंतर काढण्यात आलेल्या नव्या जाहिरातीनुसार २१ सप्टेंबरपासून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अर्ज करण्यासाठी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. पहिल्या जाहिरातीनुसार ९ सप्टेंबरपर्यंत एकूण १ लाख ५७ हजार ६३८ उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी ७३ हजार ९१८ उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले आहे. सुधारित जाहिरातीनुसार ११ ऑक्टोबरपर्यंत ४८ हजार ९४४ उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी ३७ हजार ४४० उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले आहे. दोन्ही टप्प्यांत मिळून एकूण २ लाख ६ हजार ५८२ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या एकूण १ लाख ११ हजार ३५८ इतकी आहे.