‘मेक इन इंडिया’मध्ये महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याबाबत जोरदार प्रचार
‘मेक इन इंडिया’मध्ये महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी राज्य सरकार आक्रमकपणे प्रचारात उतरत असून सुमारे दोन लाख रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार (एमओयू) करण्यासाठी पावले टाकण्यात आली आहेत. राज्यातील तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ, उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि उद्योगांमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत असलेले प्रथम स्थान यामुळे विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रच सर्वोत्तम स्थान असल्याचा प्रचार केला जाणार आहे.
‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्घाटन १३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत होत असून त्यासाठी राज्य सरकारने जोरदार तयारी केली आहे. उद्योग विभागाकडून अनेक कंपन्यांशी चर्चा करण्यात येत आहे. आतापर्यंत साधारणपणे दोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी काही कंपन्यांनी सामंजस्य करार (एमओयू) तयारी दर्शविली असून त्याचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल. आणखी उद्योगसमूहांशीही चर्चा सुरू असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर यासारख्या शहरांमध्ये उद्योगांसाठी पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ व अन्य सोयीसुविधा उपलब्ध आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) उभारण्यासाठी तयारी सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ तारखेला या सप्ताहाचे उद्घटन वांद्रे-कुर्ला संकुलात होणार आहे. त्यावेळी चार-पाच देशांचे प्रमुख, अन्य देशांमधील उद्योग व अन्य महत्त्वाच्या विभागांचे प्रमुख, उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. या विशेष निमंत्रितांसाठी टर्फ क्लब येथे रात्री आलिशान मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक राज्यांसाठी वांद्रे-कुर्ला संकुलात स्टॉल्स उभारण्यात येत आहेत. या सप्ताहाचे बोधचिन्ह ‘लामणदिवा’ असून एक भव्य लामणदिवा वांद्रे-कुर्ला संकुल येथे राहील.
गिरगाव चौपाटीवर १४ फेब्रुवारीला करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासह कार्यक्रमांच्या ठिकाणी आणि शहरातील महत्त्वाच्या जागी लामणदिवे उभारले जाणार आहेत. मुंबईकरांनी पाहुण्यांचे स्वागत करावे आणि मुंबईत आठवडाभर उत्साही व आनंदी वातावरण असावे, यासाठी सजावट, आतषबाजी व अन्य तयारी करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणाबाबत तिढा
‘मेक इन इंडिया’मध्ये ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मेक इन मुंबई’ होत असले तरी भाजप सरकारला पाठिंबा असलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मात्र निमंत्रण देण्याबाबतचा तिढा अजून कायम आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन समारंभात व्यासपीठावर ठाकरे यांना राजशिष्टाचारानुसार बसविता येणार नसल्याचे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे विशेष निमंत्रित म्हणून पहिल्या रांगेत बसण्याचे निमंत्रण ठाकरे स्वीकारणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे व्यासपीठावर बसण्यासाठी आमंत्रण नसेल, तर टर्फ क्लब येथील मेजवानी आणि नंतर आठवडाभर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी जाण्यास ठाकरे तयार नसल्याचे समजते. त्यामुळे हा तिढा मुख्यमंत्री फडणवीस यांना अतिशय कौशल्याने सोडवावा लागणार आहे.

Story img Loader