मुंबई: चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी दोघांनी लंपास केल्याची घटना मुलुंड परिसरात घडली. याप्रकरणी वृद्ध महिलेने केलेल्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. विद्या चव्हाण (६१) असे या वृद्ध महिलेचे नाव असून त्या कळवा परिसरात राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्या एका कार्यालयात सफसफाईचे काम करीत आहेत. कार्यालयातील काम संपल्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी त्या घरी जात होत्या. यावेळी त्यांना रस्त्यात एका व्यक्तीने हाक मारली आणि चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

हेही वाचा >>> म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२४ : सुमारे ४४२ घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी

चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या अपेक्षेने महिलेने तत्काळ त्याला होकार दर्शवला. नवे कार्यालय दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेला एका इमारतीच्या मागे नेले. तेथे त्याचा एक साथीदार उभा होता. महिलेला गळ्यातील मोठी सोनसाखळी पर्समध्ये ठेवण्यास त्यांनी सांगितले. महिलेने तत्काळ आरोपींवर विश्वास ठेवून सोनसाखळी पर्समध्ये ठेवली. याचवेळी आरोपींनी महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्या पर्समधील सोनसाखळी घेऊन पोबारा केला. बराच वेळ झाला तरी दोघेही परत आले नाहीत. त्यामुळे महिलेने पर्स उघडून पाहिली असता त्यातील सोनसाखळी गायब होती. महिलेने घरी पोहोचल्यावर घडलेला प्रकार मुलाला सांगितला. दोघांनी तात्काळ मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.