उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाद्वारे भरून दिलेली माहिती ‘व्हायरस’मुळे ‘करप्ट’ झाल्याने ‘राज्य सेवा पूर्व परीक्षे’बरोबरच विमा तांत्रिक सहाय्यक आणि कृषि प्रशासकीय अधिकारी या दोन पदांच्या परीक्षाही ‘महाराष्ट्र लोक सेवा आयोगा’ला (एमपीएससी) रद्द कराव्या लागल्या आहेत.
या दोन पदांसाठी अनुक्रमे २१ आणि २८ एप्रिलला परीक्षा होणार होती. पण, पूर्व परीक्षेप्रमाणे याही दोन परीक्षांच्या उमेदवारांची माहिती करप्ट झाल्याने त्या रद्द कराव्या लागत आहेत, असे एमपीएससीचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी सांगितले. यापैकी विमा तांत्रिक सहाय्यक पदाची (गट क) परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात येत आहे. याआधी २४ फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर तीची तारीख पुढे ढकलून २१ एप्रिल करण्यात आली. आता तर ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
या दोन्ही परीक्षांसाठी अनुक्रमे सहा हजार आणि ८०० उमेदवार बसले आहेत. पण, गेल्या महिन्यात व्हायरसमुळे पूर्व परीक्षेबरोबरच याही परीक्षांची माहिती करप्ट झाली आहे. उमेदवारांची माहिती उपलब्ध नसल्याने परीक्षांसाठी प्रवेशपत्र तयार करणेच शक्य नाही. परिणामी एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. व्हायरसमुळे एमपीएससीला या आधी ७ एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलावी लागली होती.
माहिती लवकरात लवकर भरावी
एमपीएससीने पूर्व परीक्षेच्या उमेदवारांना आपली जुजबी माहिती संकेतस्थळावर भरण्यास सांगितले होते. पण, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने माहिती भरण्याची प्रक्रियाही थंडावली आहे. त्यामुळे, आतापर्यंत एकूण २ लाख ९८ हजार उमेदवारांपैकी केवळ दोन लाख ४० हजार उमेदवारांनी आपली माहिती भरून दिली आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. उर्वरित उमेदवारांनीही आपली माहिती लवकरात लवकर भरून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सर्व उमेदवारांची माहिती आल्यानंतर आम्ही परीक्षा कधी घ्यायची याचा निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापुढे ‘वास्टइंडिया’शी करार नाहीच – अध्यक्षांचे स्पष्टीकरण
एमपीएससीच्या परीक्षांकरिता ऑनलाईन अर्ज भरून घेऊन प्रवेशपत्र तयार करण्याचे काम करणाऱ्या ‘वास्टइंडिया’ या खासगी आयटी कंपनीशी भविष्यात करार करणार नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला नव्याने निविदा मागविता येणे शक्य नाही. त्यामुळे, या तीन परीक्षांपुरती तरी आम्हाला या कंपनीचे सहकार्य घ्यावे लागेल. पण, खबरदारीची बाब म्हणून आम्ही आमच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे काम कंपनीकडून करवून घेत आहोत, असे स्पष्ट केले.
रद्द परीक्षांचा तपशील
* कृषी प्रशासकीय अधिकारी
* पदसंख्या – ६०००
* विमा तांत्रिक सहाय्यक (गट – क)
* पदसंख्या – ८००
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा