जुलैपूर्वी ताफ्यात दाखल होण्याची शक्यता; २० हून अधिक फेऱ्या
उपनगरीय प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर आणखी दोन १५ डब्यांच्या गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडय़ांच्या २० हून अधिक फेऱ्या होणार असून जुलै महिन्यात नवे वेळापत्रक लागू होईल. तत्पूर्वी जादाचे डबे चालवण्याकरिता रेल्वेला नव्या गाडय़ांची गरज आहे. या नव्या गाडय़ा जुलैपूर्वी ताफ्यात दाखल करण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार आहे.
पश्चिम रेल्वेचा पसारा चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंत आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १०० लोकल गाडय़ा असून देखभाल-दुरुस्तीमुळे प्रत्यक्षात ८९ गाडय़ाच सेवेत असतात. या गाडय़ांच्या १,३०० हून अधिक फेऱ्या होतात आणि ३८ लाखांपेक्षा अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. सध्या १२ डब्यांच्या आणि १५ डब्यांच्या गाडय़ा सेवेत आहेत. १५ डब्यांच्या चार गाडय़ा असून त्यांच्या ५४ फेऱ्या होतात. याआधी तीनच १५ डबा गाडय़ा होत्या. प्रवासी क्षमता वाढवण्याकरिता १५ डबा गाडय़ा वाढवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ पासून आणखी एका १५ डबा लोकल गाडय़ांची भर पडली. त्यामुळे जवळपास २० फेऱ्या वाढल्या. मात्र प्रवाशांची वाढणारी संख्या आणि १५ डबा गाडय़ांमध्ये सामावणारे प्रवासी पाहता पश्चिम रेल्वेने आणखी दोन १५ डबा गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यापासून लागू होणाऱ्या नवीन वेळापत्रकात या दोन गाडय़ांच्या २० हून अधिक फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले जात आहे, परंतु पश्चिम रेल्वेला नव्या गाडय़ांची आवश्यकता आहे. नवीन गाडय़ा आल्याशिवाय २० फेऱ्या वाढवणे कठीण आहे, तरीही नवीन गाडय़ा जुलैपूर्वी ताफ्यात दाखल करण्याचा पश्चिम रेल्वेचा प्रयत्न आहे.
अंधेरी ते विरारच्या प्रवाशांना फायदा
अंधेरी ते विरापर्यंत प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या पट्टय़ात धिम्या मार्गावर पंधरा डबा गाडय़ा चालवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी फलाटांची लांबी वाढवण्याचे काम केले जाईल. या कामांसाठी निविदा काढण्यात आली असून दोन वर्षांत काम पूर्ण केले जाणार आहे.
१५ डबा गाडय़ा चालवण्यासाठी चार गाडय़ांची गरज पश्चिम रेल्वेला लागणार आहे. दोन गाडय़ा चालवताना अन्य दोन गाडय़ा या जादा म्हणून ठेवण्यात येतात. जुलै महिन्यापासून नवीन वेळापत्रक लागू केले जात असून त्यात दोन १५ डब्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा प्रयत्न राहील.
– मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे