मुंबई : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विस्तारण्यात येत असून, आता मध्य रेल्वेवर आणखी दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई ते कोल्हापूर, तेथून पुढे पुणे ते वडोदरा जाणारी वंदे भारत सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
देशभरातील धार्मिक स्थळे आणि व्यावसायिक केंद्रांना वंदे भारत एक्स्प्रेसने जोडण्याचे काम सुरू आहे. कमी वेळात, आरामदायी आणि वेगात प्रवास होण्यासाठी वंदे भारत प्रवाशांच्या पसंतीस पडली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर बनवण्यासाठी मध्य रेल्वेवरून दोन वंदे भारत वाढवण्यात येणार आहेत. प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई ते कोल्हापूर आणि पुणे ते वडोदरा वंदे भारत चालवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रमुख शहरांत कमी वेळेत पोहोचता येईल.
हेही वाचा – मुंबई : दहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या
सध्या मुंबईतून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते जालना वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. तर, आता सीएसएमटीवरून कोल्हापूर जाणारी पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस ठरणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते गांधीनगर वंदे भारतला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, महाराष्ट्र आणि गुजरात जोडण्यासाठी पुणे-वडोदरा वंदे भारत एक्स्प्रेस जोडली जाणार आहे. पुणे-वडोदरा वंदे भारत एक्स्प्रेस ही वसई रोडवरून जाईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.