मुंबई : पश्चिम घाटातील तमिळनाडू राज्यात पालीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला असून ‘निमास्पिस ट्रायड्रा’ आणि ‘निमास्पिस सुंदरा’ अशी नावे या प्रजातींना देण्यात आली आहेत. न्यूझिलंडच्या झूटॅक्सा या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच या बाबतचा शोधप्रबंध प्रसिद्ध करण्यात आला.
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटात पालीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध साताऱ्यातील अमित सय्यद यांनी लावला आहे. वन्यजीव संशोधक सय्यद यांनी पालींची नावे त्यांच्या शरीर रचनेवरुन ठेवली आहेत. ‘निमस्पिस ट्रायड्रा’ या पालीच्या शरीरावर असणाऱ्या पिवळ्या, पांढऱ्या आणि काळ्या अशा तीन रंगांमुळे ट्रायड्रा असे नाव देण्यात आले आहे. तर, शरीरावर असणाऱ्या काळ्या, पिवळ्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या नक्षीमुळे दुसऱ्या प्रजातीला ‘निमस्पिस सुंदरा’ असे नाव देण्यात आले आहे.
या कुळातील पालींवर मागील दहा वर्षापासून अभ्यास करणाऱ्या सय्यद यांना २०१८ मध्ये प्रथम पालीच दर्शन झाले होते. त्यावेळी दिसलेली पाल वेगळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर नवीन संशोधन त्यांच्या हाती लागले आहे. त्यात सय्यद हे प्रमुख संशोधक असून त्यांच्यासोबत सॅमसन कुरुंबकरण, राहुल खोत, शिवा हर्षन, ओमकार अधिकारी, आयान सय्यद, मासूम सय्यद, अहमद फैजल, अहमद जेरिथ, शुभंकर देशपांडे, जयदत्त पूरकायस्थ आणि शर्वरी सुलाखे हे सहभागी होते.
हेही वाचा : अजित पवारांकडून इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त अभिवादन, म्हणाले, “त्यांचा झंझावाती राजकीय प्रवास…”
दोन्ही पाली या आकाराने अतिशय लहान असून त्या जास्तीत जास्त ३५ मिलिमीटर एवढ्याच लांबीच्या असतात. भारतातील पश्चिम घाट हा जैवविविधतेने समृद्ध असल्यामुळे पश्चिम घाटातील विविध जंगलामध्ये असंख्य प्रकारची लहान मोठे प्राणी आपले वास्तव्य टिकवुन आहेत. या पालींच्या शोधामुळे पश्चिम घाटातील सौंदर्यात आणखी भर पडली आहे. – अमित सय्यद, वन्यजीव संशोधक