आयएनएस सिंधुरत्न दुर्घटनेत काळ्याकुट्ट रंगातही शौर्याची एक रुपेरी किनार असल्याचे शुक्रवारी समोर आले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले लेफ्टनंट कमांडर कपिश मुनवाल आणि लेफ्टनंट कमांडर मनोरंजन कुमार या दोघांनी पाणबुडीतून धूर येत असल्याचे ध्यानात आल्यावर तातडीने कार्यवाही करीत अग्निशमन यंत्रणा सुरू केली. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे पाणबुडीवरील अन्य ९२ जणांचे प्राण वाचले. मात्र हे करताना या दोघांना आपले प्राण गमवावे लागले.
आयएनएस सिंधुरत्नच्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही नौसैनिकांची ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद यलो गेट पोलीस ठाण्यात करण्यात आली. या दोघांनाही शुक्रवारी नौदलाच्या पश्चिम विभागीय मुख्यालयातर्फे मानवंदना देण्यात आली. या दोघांच्याही पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापैकी लेफ्टनंट कमांडर कपिश मुनवालवर (२८) मुंबईतच चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर लेफ्टनंट मनोरंजन कुमारचे (२६) पार्थिव जमशेदपूरला पाठविण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन पार पडल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. शुक्रवारी सकाळी पश्चिम विभागीय नौदल मुख्यालयातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. त्या वेळेस पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल शेखर सिन्हा स्वत: जातीने उपस्थित होते. दोन्ही पार्थिवांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णयही या प्रसंगी घेण्यात आला. या घटनेचा दुखवटा म्हणून नौदलाचा ध्वज अध्र्यावर उतरवण्यात आला होता.
व्हाइस अ‍ॅडमिरल शेखर सिन्हा यांनी दोघांच्याही कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईचा निर्णयही त्वरेने घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

मृत्यूची घोषणा उशिराने
सर्व वृत्तपत्रांमध्ये शुक्रवारी मृत्युमखी पडलेल्या नौसैनिकांच्या नावासह वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नौदलाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांची नावे जाहीर करणारे प्रसिद्धीपत्रक काढले. त्यानंतर संध्याकाळी प्रसिद्धीपत्रक काढून त्यांना मानवंदना दिल्याचे वृत्त जारी करण्यात आले.

Story img Loader