लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी, रेल्वे पोलिसांनी या चोरांवर करडी नजर ठेवली. रेल्वे पोलिसांनी नुकताच चोरीप्रकरणी मनीष शेंडे (४१) आणि अशरफ शेख (४९) या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून १.१५ लाख रुपये किंमतीचे तीन लॅपटॉप हस्तगत करण्यात आले.
लोकलमधील गर्दी दिवसेंदिवस वाढत असून चोरांच्या टोळ्या प्रवाशाला हेरून त्याची नजर चुकवून लॅपटॉप असलेली बॅग, अथवा अन्य साहित्य चोरत आहेत. प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू, साहित्याची चोरी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या आरोपींना अटक करून चोरलेल्या वस्तू हस्तगत करण्याची सूचना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांनी त्यांच्या पथकाला केल्या होत्या.
शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वडाळा युनिट येथील पोलीस उप निरीक्षक शंकर परदेशी व पोलीस अंमलदारांनी लॅपटॉपसह बॅग चोरी करणाऱ्या गुन्हे अभिलेखावरील आरोपी मनिष शेंडे उर्फ पिंट्या (४१), अशरफ शेख (४९) या दोघांना स्टॅण्डहर्स्ट रोड येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी एक लाख १५ हजार ७९५ रुपये किंमतीचे एकूण तीन लॅपटॉप चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून तिन्ही लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच ठाणे, कुर्ला आणि पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यांतील तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.