लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करणाऱ्या अनोळखी व्यक्तीची हत्या करून त्याने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या दोघांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली.

टिळक नगर पोलिसांना चेंबूरमधील पेस्तम सागर रोड क्रमांक ६ वर १९ जून रोजी एक अनोळखी व्यक्ती झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. पोलिसांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. मात्र दोन दिवसांपूर्वी या इसमाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना उपलब्ध झाला. या व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमुद करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

हेही वाचा… अनधिकृत शाळांची केवळ यादी जाहीर; प्रत्यक्ष कारवाईकडे मात्र प्रशासनाचा कानाडोळा

या परिसरात राहणारा गौतम बोराडे (२८) आणि अफजल शेख (२०) यांनी या अनोळखी व्यक्तीला मारहाण केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. मृत्यू झालेल्या व्यक्तीने शिवीगाळ केल्याने त्याला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने भीतीपोटी त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

Story img Loader