मुंबई : ग्राहकांच्या मागणीनुसार वाहनांची चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात दिंडोशी पोलिसांना यश आले. आरोपींकडून पाच चोरीच्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. या दोघांनी उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील वाहनांची चोरी केल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वसिम अल्ताफ पठाण (३७) व शाहिद अयुब खान (३४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. पठाणविरोधात वाहन चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. दिंडोशी पोलिसांच्या हद्दीतील रहेजा आयटी पार्क परिसरात २ डिसेंबर रोजी एक वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याला थांबवण्याचा इशारा करताच तो अधिक वेगाने वाहन चालवू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला गाठले. चालक व त्याच्या साथीदाराची चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्याच्या वाहनाची कागदपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचे लक्षात आले.
हेही वाचा – मुंबई : फ्लेमिंगोंच्या सुरक्षेसाठी डीपीएस तलाव कुंपणबंद
चौकशीत आरोपींनी ते वाहन उत्तर प्रदेशातून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वाहन चोरीप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून आणखी चार वाहने हस्तगत करण्यात आली. मागणीनुसार आरोपी वाहनांची चोरी करून विक्री करीत होते. यामागे आंतरराज्यीय टोळी असल्याचे निष्पन्न झाले.